
नाशिक, 04 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक चार आणि पाच जुलै २०२६ दरम्यान एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नाशिकच्या गोखले शिक्षण संस्थेच्या बी. बाय. के. कॉलेज परिसरातील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटनमहाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष देवेन दोषी आणि मित्र विहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख, सचिव हेमंत पांडे, माजी अध्यक्ष जे. के.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलतांना देवेन दोषी यांनी सांगितले की, ब्रीज हा आपल्या बुद्धीला चालना देणारा खेळ आहे. आय. टी. क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.त्यामुळे जास्तीत जास्त तरुण खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या वैयक्तिक जीवनात याचा फायदा करून घ्यावा असे सांगतले. विनोद कपूर यांनी सांगितले की, ब्रीज खेळाच्या सर्व उपक्रमासाठी मित्र विहार क्लबचे आणि नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे कायमच सहकार्य राहील. यावेळी नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या एशियन ब्रीज चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक मिळविलेल्या भारताच्या संघातील खेळाडू अनिल पाध्ये आणि राजू तोलानी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आज सुरु झालेल्या या स्पर्धेत बाबला, स्पार्टन, अहमदाबाद, सरस, सह्याद्री, अमानोरा, इच्जे, फिंटॉन, जाम, एस. बी.एस. फ्रेनिमिस, एडीबीए, बोनस, वेदान्त, मित्र विहार 'अ' आणि मित्र विहार ' ब' अशा १६ संघांनी सहभाग नोंदवला आहे. उद्घाटनानंतर स्विस लीग स्पर्धाना सुरुवात झाली. यामध्ये प्रथम सत्रात १४ बोर्डचे दोन राऊंड खेळविले गेले. यामध्ये श्रीनिवासन, डॉ. अजित पडळकर, कौस्तुभ बेंद्रे, गौरव राजवाडे, नितीन शिरोळे, पराग जोशी यांच्या सह्याद्री संघाने सर्वात जास्त ३२. ९१ गुण संपादन करत आघाडी घेतली होती. त्यानंतर अहमदाबाद (३१.३२), सारस (३०.४०), फिंटन (२७.२३) असे गुण मिळवत चांगली सुरुवात केली होती. तिसऱ्या आणि चवथ्या राऊंड नंतर थोडेसे चित्र पालटले.
इयान कॉन्सर्ससीन, सुभाष भावनांनी, इवान अल्फोन्सो आणि डॉ. सुबीर रॉय यांच्या फिंटॉन संघाने चांगला खेळ करत ६३.८३ गुणांवर मजल मारली, सह्याद्री संघाचे त्या खालोखाल ५४.९८ गुणांमुळे ते दुसऱ्या स्थानावर सरकले आहेत. तर फ्रेनीमिस संघाने ५०.१३ गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दोन राऊंड नंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या अहमदाबाद संघाला ४७.५९ गुणांच्या आधारे चवथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. आता आणखी दोन राउंड बाकी असून यामध्ये काय परिस्थिती असेल यावर सर्व संघांची पुढील वाटचाल ठरणार आहे. कारण या दोन राऊंडनंतर पहिले चार संघ उद्या होणाऱ्या सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV