बीड - ७ जागा सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवा; आ. क्षीरसागर यांचा अशासकीय ठराव
बीड, 04 जुलै (हिं.स.)। राज्यात शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी विधानपरिषदेत आहेत; मात्र पोलिसांना हक्काचे व्यासपीठ नसल्याने त्यांच्यावर मानसिक व आर्थिक अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधा
बीड - ७ जागा सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवा; आ. क्षीरसागर यांचा अशासकीय ठराव


बीड, 04 जुलै (हिं.स.)।

राज्यात शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी विधानपरिषदेत आहेत; मात्र पोलिसांना हक्काचे व्यासपीठ नसल्याने त्यांच्यावर मानसिक व आर्थिक अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अशासकीय ठराव दाखल केला आहे. विधानपरिषदेतील रिक्त १८ जागांपैकी ७ जागा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात सेवेतील व सेवानिवृत्त पोलिसांची संख्या सुमारे १० लाख असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या ७० लाखांच्या घरात आहे. या मोठ्या घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांप्रमाणे 'पोलिस आमदारांची' निर्मिती करावी, अशी मागणी ठरावात आहे. पोलिसांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी लोकशाहीच्या दृष्टीने त्यांचे प्रतिनिधी असणे हिताचे राहील, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. या सुविधेत जिल्हा पोलिस, दारूबंदी, लोहमार्ग, राज्य राखीव पोलिस, आयआरबी, तटरक्षक दल आणि होमगार्ड या सर्वांचा समावेश करावा आणि प्रशासकीय विभागानुसार उमेदवारी देऊन हे ७ 'पोलिस आमदार' नियुक्त केले जावेत, जेणेकरून पोलिसांच्या प्रश्नांना सभागृहात न्याय मिळेल, असेही आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande