महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल; पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
रायगड, 04 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरासह सावित्री नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना अधिक वेगाने सुरू केल्या आहेत. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर
NDRF team arrives in Mahad; administration prepared in the wake of floods.


रायगड, 04 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरासह सावित्री नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना अधिक वेगाने सुरू केल्या आहेत. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक महाडमध्ये दाखल झाले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल, नगरपालिका तसेच इतर यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतराची तयारी करण्यात आली आहे.

एनडीआरएफचे जवान बचाव साहित्य, बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड आणि इतर अत्याधुनिक उपकरणांसह महाडमध्ये तैनात करण्यात आले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, बचावकार्य आणि मदतकार्य तातडीने हाती घेण्यासाठी हे पथक सज्ज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाची तीव्रता कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून २४ तास नियंत्रण ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande