अमरावती - सभागृहात कचरा फेकल्याप्रकरणी तीन नगरसेवकांना नोटीस
अमरावती, 04 जुलै, (हिं.स.)। पुलगाव नगर परिषदेच्या विशेष सभेदरम्यान सभागृहात कचरा आणि नालीतील सांडपाणी आणून अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या मंचासमोर टाकल्याच्या आरोपावरून नगर परिषद प्रशासनाने तीन नगरसेवकांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्याधि
अमरावती - सभागृहात कचरा फेकल्याप्रकरणी तीन नगरसेवकांना नोटीस


अमरावती, 04 जुलै, (हिं.स.)। पुलगाव नगर परिषदेच्या विशेष सभेदरम्यान सभागृहात कचरा आणि नालीतील सांडपाणी आणून अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या मंचासमोर टाकल्याच्या आरोपावरून नगर परिषद प्रशासनाने तीन नगरसेवकांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी आज नगरसेवक प्रवीण जुगलकिशोर पनिया, दुर्गेश देवीप्रसाद यादव आणि आकाश ईश्वर कागडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नोटिशीनुसार, २९ जून २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेदरम्यान संबंधित नगरसेवकांनी दोन पोती कचरा तसेच नालीतील सांडपाणी सभागृहात आणून फेकले. या घटनेमुळे सभागृहाची प्रतिष्ठा व पवित्रता बाधित झाली, सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि नगर परिषदेची प्रतिमा मलिन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत शासनाच्या स्वच्छता नियमांनुसार तिन्ही नगरसेवकांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून उपद्रव निर्माण केल्याबद्दल प्रत्येकी १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तो तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाअंतर्गत संबंधित नगरसेवकांना पदावरून दूर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे का पाठवू नये, याबाबत तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील एकतर्फी कारवाई करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande