
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। एक शेतकरी – एक देशी गाय ही योजना राज्यभर राबवून देशी गोवंश संवर्धनाला चालना द्यावी, असा प्रस्ताव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत मांडला. यासोबतच राज्यातील वाढत्या रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्य, जमिनीची सुपीकता आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वततेसमोर गंभीर आव्हाने निर्माण होत असल्याचा मुद्दा कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत उपस्थित केला.
सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र व सर्वसमावेशक धोरण आखावे, अशी मागणी त्यांनी केली.दुधातील भेसळीप्रमाणेच रासायनिक शेतीतून निर्माण होणारी अदृश्य भेसळ अधिक घातक असल्याचे सांगत त्यांनी कॅन्सर, हृदयविकार, किडनी आणि लिव्हरच्या आजारांमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असताना, शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीबाबत व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.देशी गोवंश संवर्धन हे शाश्वत शेतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे नमूद करत आमदार कल्याणशेट्टी यांनी खिलार, देवणी, डांगी, गवळाऊ आणि गीर यांसारख्या देशी गायींच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र धोरण राबविण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड