
पिंपरी, 04 जुलै (हिं.स.) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत दिली जाणार असून, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.
महापालिकेकडून मालमत्ताधारकांना एसएमएस आणि टेली-कॉलिंगच्या माध्यमातून कर भरण्याची अंतिम मुदत, उपलब्ध सवलती, थकबाकीची माहिती तसेच ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कर भरण्याच्या सुविधांबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. कर भरण्यासंदर्भातील शंका आणि अडचणींची नोंद घेऊन त्यांचे संबंधित विभागामार्फत तातडीने निराकरणही केले जात आहे.
डेटा-आधारित संवाद प्रणालीचा वापर केल्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने माहिती पोहोचत असून, जनजागृती आणि थेट संवादामुळे कर भरण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.दरम्यान, ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु