
पुणे, 04 जुलै (हिं.स.) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अंतर्गत रिंगरोड प्रकल्पाला गती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी आणि प्राथमिक भूसंपादनासाठी ५५.०३ कोटी रुपयांची भांडवली तरतूद केली आहे.
एकूण ८३.१२ किलोमीटर लांबीचा आणि ६५ मीटर रुंदीचा हा अत्याधुनिक रिंगरोड उभारण्यात येणार असून, त्यामध्ये १२.६२ किलोमीटर लांबीचे बोगदे, १७ मोठे पूल आणि ९ उड्डाणपूल (इंटरचेन्जेस) उभारले जाणार आहेत. या मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि लोहेगाव विमानतळ यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. अभियांत्रिकी विभागाने सुचविलेल्या आधुनिक तांत्रिक सुधारणांचे अवलोकन करून प्रकल्पाचा सविस्तर आराखडा युद्धपातळीवर अंतिम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात मोशी-आळंदी परिसरातील सोळू, निरगुडी आणि वढू खुर्द (वडगाव शिंदे) या भागातील ४.७० किलोमीटरच्या प्राधान्य मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पातील प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे दूर करण्यात पीएमआरडीएला यश आले असून, आता प्रत्यक्ष कामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, औद्योगिक, आयटी आणि विमानतळ परिसरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु