
जळगाव, 04 जुलै, (हिं.स.) | जळगावच्या पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात केलेल्या तक्रारीची पाचोरा पोलिसांनी तातडीने दखल घेत धडक कारवाई केली.
गावातील एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. विष्णू उर्फ विक्की राजू पाटील (रा. कुरंगी, ता. पाचोरा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारूचा साठा करून त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. गावातील महिलांनी याबाबत सातत्याने तक्रार केल्यानंतर पाचोरा पोलिसांनी कारवाईचे नियोजन करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये संशयित आरोपी अवैध दारूची विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळावरून दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पाचोरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, अवैध दारू विक्री, मादक पदार्थांची तस्करी व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. अशा प्रकारची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.महिलांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत करण्यात आलेल्या या कारवाईचे कुरंगी गावात स्वागत होत असून, गावातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर