राजापेठ पोलिसांची तत्पर कारवाई; हरवलेले २५ लाखांचे सोन्याचे दागिने शोधून फिर्यादीच्या ताब्यात
अमरावती, 04 जुलै (हिं.स.)। पत्नीच्या उपचारासाठी हैदराबादला जाताना हरवलेले तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राजापेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत फिर्यादीच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे कुटुंब
राजापेठ पोलिसांची तत्पर कारवाई; हरवलेले २५ लाखांचे सोन्याचे दागिने शोधून फिर्यादीच्या ताब्यात


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)।

पत्नीच्या उपचारासाठी हैदराबादला जाताना हरवलेले तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राजापेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत फिर्यादीच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.साईनगर येथील गजानन अंबर वर्धे (वय ५२) यांनी १ जुलै २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या पत्नी संगीता वर्धे यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता भासू शकते, या कारणाने त्यांनी पत्नीचे सुमारे १४० ते १५० ग्रॅम वजनाचे, अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लाल रंगाच्या बॅगेत ठेवून सोबत नेले होते.उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगून त्यांना अमरावतीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अॅम्ब्युलन्सने परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. मात्र वाटेत आदिलाबाद येथे संगीता वर्धे यांचे निधन झाले. त्यानंतर अमरावतीत अंत्यसंस्काराची धावपळ सुरू असताना गाडीत ठेवलेली दागिन्यांची बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी राजापेठ पोलिसांकडे धाव घेतली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांना माहिती देत विशेष पथक हैदराबादकडे रवाना केले. पथकातील पोलिसांनी हैदराबाद येथील एआयजी रुग्णालय, आदिलाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच हैदराबाद-आदिलाबाद मार्गावरील जनता रेस्टॉरंट परिसरातील तब्बल ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले. दिवस-रात्र केलेल्या अथक शोधमोहीमेनंतर जनता रेस्टॉरंट परिसरातून लाल रंगाची बॅग शोधण्यात पोलिसांना यश आले.या बॅगेमध्ये अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच उपचारासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल फिर्यादी गजानन वर्धे यांच्या ताब्यात सुपूर्द केला.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि नितीन शिंदे तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईबद्दल राजापेठ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande