वसमत रोडवरील 2007 मधील आंदोलन प्रकरणी 19 वर्षांनंतर आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता
परभणी, 04 जुलै (हिं.स.)। परभणीतील वसमत रोड येथे 2007 साली झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाने 11 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ न्यायालयीन लढा देणार्या क
19 वर्षांनंतर आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता :  2007 मधील वसमत रोडवरील आंदोलन प्रकरण


परभणी, 04 जुलै (हिं.स.)।

परभणीतील वसमत रोड येथे 2007 साली झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाने 11 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ न्यायालयीन लढा देणार्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाबाबत आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये विविध मागण्यांसाठी वसमत रोड येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी पोलिसांनी आंदोलनस्थळी लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. तसेच काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात आंदोलनकर्त्यांकडून गोफण जप्त केल्याचे दाखवून विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांना रात्री न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर किर्तीकुमार बुरांडे विरुद्ध राज्य सरकार या नावाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. जवळपास 19 वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या कालावधीत काही आरोपींचे निधन झाले, काही जण वयोमानामुळे अशक्त झाले, तर काही जण रोजगारासाठी परभणीबाहेर स्थायिक झाले. मात्र प्रमुख 11 कार्यकर्त्यांनी नियमितपणे न्यायालयीन लढा सुरू ठेवला. या प्रकरणात किर्तीकुमार बुरांडे, माधुरी क्षीरसागर, लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, गणपत गायकवाड, बाळासाहेब मोहाटे, छाया गायकवाड, शेख मुन्सी, शेख महेबूब, अनिता धोंगडे आणि शेख नबी या कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अॅड. माधुरी क्षीरसागर, अॅड. लक्ष्मण काळे आणि अॅड. सुनील बागल यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. न्यायालयाच्या निर्णयानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत हा न्यायाच्या विजयाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande