नांदेड - जांब बु. ग्रा.पं.च्या ७०० कचराकुंड्यांवर प्रश्नचिन्ह; कुंड्यांचा हिशोबच लागेना
नांदेड, 04 जुलै, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेल्या जांब बु, ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ७०० कचराकुंड्यांच्या वितरण व हिशोबावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या बाबींमुळे ग्रामपंचायतीच्या
नांदेड - जांब बु. ग्रा.पं.च्या ७०० कचराकुंड्यांवर प्रश्नचिन्ह; कुंड्यांचा हिशोबच लागेना


नांदेड, 04 जुलै, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेल्या जांब बु, ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ७०० कचराकुंड्यांच्या वितरण व हिशोबावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या बाबींमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे ७ लाख रुपये खर्च करून ७०० प्लास्टिक कचराकुंड्यांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी ग्लोबल एंटरप्रायजेस मार्केट एजन्सीकडून झाल्याची नोंद असून, ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील माहितीनुसार प्रत्येक कचराकुंडीची किंमत १ हजार रुपये दर्शविण्यात आली आहे. मात्र, माहिती अधिकारात विचारणा केल्यानंतर ग्रामपंचायतीने केवळ ४०० कचराकुंड्या वाटप केल्याचे नमूद केले आहे.

उर्वरित ३०० कचराकुंड्यांचा कोणताही लेखी तपशील उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. याशिवाय, ४०० कचराकुंड्या वाटप केल्याचा दावा केला जात असला तरी त्यांचे लाभार्थी कोण, याबाबतची कोणतीही अधिकृत नोंद ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक निधीतून खरेदी केलेल्या साहित्याचे वितरण व नोंदीच उपलब्ध नसणे हा गंभीर प्रशासकीय हलगर्जीपणाचा प्रकार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande