रायगड - ७५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून
रायगड, 04 जुलै (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील पाणीयुक्त परिसरातील करंबेली–ठाकरवाडी रस्त्याचे मोठ्या गाजावाजात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात हा रस्ता वाहून गेल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक
Road-secured-after-a-75-year-w


रायगड, 04 जुलै (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील पाणीयुक्त परिसरातील करंबेली–ठाकरवाडी रस्त्याचे मोठ्या गाजावाजात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात हा रस्ता वाहून गेल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला रस्ता अल्पावधीतच निकामी ठरल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरवाडी परिसरात प्रामुख्याने आदिवासी बांधव वास्तव्यास असून, गेली अनेक वर्षे मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. रस्ता मंजूर झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याचा मोठा भाग खचून वाहून गेला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता बांधकामादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच रस्त्याला आवश्यक मजबुती न दिल्यामुळे पावसाच्या पाण्याचा तडाखा सहन न करता रस्ता कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून रस्त्याची तातडीने नव्याने आणि दर्जेदार बांधणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शासनाच्या विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande