
रायगड, 04 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, जिल्ह्यातील पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रायगडमधील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांपर्यंत पर्यटकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये घारापुरी (एलिफंटा) लेणी, अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला आणि अलिबागमार्गे श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प राज्य शासनाच्या ‘पर्वतमाला’ योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत.
या रोप-वे प्रकल्पांमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. विशेषतः रायगड किल्ला, माथेरान आणि कनकेश्वरसारख्या डोंगराळ भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच दुर्गम भागांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असल्याने पर्यटनाला गती मिळेल.
या प्रकल्पांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल उद्योग, वाहतूक सेवा, मार्गदर्शक आणि हस्तकला व्यवसायालाही याचा थेट फायदा होणार आहे. परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळून पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
दरम्यान, प्रकल्पांच्या पुढील टप्प्यात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पर्यावरणीय मंजुरी, तांत्रिक तपासणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
रायगडच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हे रोप-वे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असून, देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढविण्यासोबतच जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)