
लंडन, 04 जुलै (हिं.स.) - इंग्लंडच्या पुरुष निवड समितीने या महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी हॅरी ब्रुकची इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टपैलू जेम्स कोल्सचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भारताविरुद्धच्या इंग्लंडच्या टी-२० संघात त्याचा समावेश होता. जोश टंगचाही संघात समावेश आहे, जरी त्याने अद्याप एकदिवसीय पदार्पण केलेले नाही. वेगवान गोलंदाजीमध्ये गस ऍटकिन्सन आणि साकिब महमूद यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या १५ सदस्यीय संघात चार बदल केले आहेत. ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, जेमी ओव्हरटन आणि ल्यूक वूड यांच्या जागी जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद आणि जेम्स कोल्स यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी आपली तयारी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने संघातील उर्वरित मुख्य क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १४ जुलै रोजी एडजबॅस्टन येथे सुरू होईल. पुढील दोन सामने सोफिया गार्डन्स आणि लॉर्ड्स येथे खेळले जातील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १४ जुलै रोजी एडजबॅस्टन येथे पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी खेळला जाईल. तिसरा सामना १९ जुलै रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ:
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट आणि जोश टंग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे