
परभणी, 04 जुलै (हिं.स.)।
श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि. 4) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पालखी मार्गावरील विविध गावांमध्ये ग्रामस्थ व भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. वारकर्यांसाठी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. पालखीच्या दर्शनासाठी मार्गावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि पताकाधारी सहभागी झाले होते. अखंड हरिनाम, भजन-कीर्तन आणि अभंग गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने वारीत सहभाग नोंदविला. परभणी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी वारकर्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत अन्नदान, निवास व आरोग्य सुविधांची व्यवस्था केली. प्रशासन आणि पोलिस विभागाकडून वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचेही नियोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते. यंदाही शेकडो वारकर्यांच्या सहभागातून पालखी भक्तिभावाने मार्गक्रमण करीत असून परभणी जिल्ह्यातील आगमनामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis