संत तुकाराम महाराज पालखी आगमनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज
पिपंरी, 04 जुलै (हिं.स.) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारीला वेग दिला असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्गासह विविध विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला
Wari


पिपंरी, 04 जुलै (हिं.स.) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारीला वेग दिला असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्गासह विविध विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पालखी सोहळा शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा, यासाठी संबंधित विभागांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, प्रभाग अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंते शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, विजय भोजने, उमेश मोने तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.भक्ती-शक्ती चौकातून पाहणीला सुरुवात करत आयुक्तांनी महापालिकेच्या स्वागत कक्षाची पाहणी केली. मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

मार्गावरील अनधिकृत टपऱ्या व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे भाविकांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले.पालखीच्या विसावा स्थळांवर मेट्रोचे बॅरिकेड्स हटवणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि पावसाळ्यात चिखल होऊ नये म्हणून मैदानावर खडी टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आकुर्डीतील खंडोबा चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामांचा आढावा घेत रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि पालखी मार्ग अडथळामुक्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करताना आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. पालखी सोहळा हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर महापालिकेने विशेष भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande