सातपूर : कार्बन नाक्यावर १५ फूट भगदाड; रस्ता खचला, वाहतूक ठप्प
नाशिक, 04 जुलै (हिं.स.)। सातपूरमधील कार्बन नाका परिसरात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता रस्ता अचानक खचून सुमारे १० ते १५ फूट खोल भगदाड पडले. सुदैवाने कोणतेही वाहन आत न पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
Satpur: 15-foot landslide at


नाशिक, 04 जुलै (हिं.स.)। सातपूरमधील कार्बन नाका परिसरात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता रस्ता अचानक खचून सुमारे १० ते १५ फूट खोल भगदाड पडले. सुदैवाने कोणतेही वाहन आत न पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

कार्बन नाका हा सातपूर औद्योगिक व निवासी भागाला जोडणारा महत्त्वाचा चौक असून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. अचानक पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वाहने खड्ड्याच्या अगदी कडेला थांबली होती.

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी विकासकामासाठी खोदकाम झाले होते. मात्र रस्ता पुन्हा बुजवताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन झाले नसल्याचा आरोप होत आहे. खडी-दगड न वापरता व योग्य दाबणी न करता केवळ माती टाकल्याने रस्ता खचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

सातपूर अग्निशमन केंद्राचे प्रभारी केंद्र अधिकारी एस. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमन तारा सूर्यवंशी, वाहनचालक विक्रम उन्हाळे, फायरमन राजेश चौधरी तसेच ट्रेनी फायरमन शुभम लाड आणि गौरव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भगदाडाभोवती बॅरिकेड्स उभारून परिसर सुरक्षित केला.

नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या.या घटनेनंतर विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चौकट :

“हा खड्डा म्हणजे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार बोकाळला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई झाली पाहिजे.”

– देवा जाधव, सामाजिक कार्यकर्ता

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande