
अमरावती, 04 जुलै (हिं.स.)। शाळा सुरु झाल्या असून अमरावती मधील सर्व शाळा आज शनिवारपासून सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या वेळी निवडणुक आयोगकडून देण्यात आलेला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याने गुरुजींना आता अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला असून ३० जून ते २९ जुलै या कालावधीत सर्व मतदार केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी घरोघरी जावून दोन प्रतिंमध्ये गणनापत्र भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा अवधी लागणार आहे. बरेचसे बीएलओ हे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वसुली लिपीक, ग्रामपंचायत अधिकारी प्रवर्गातील असल्याने दररोज दुपारी दोन नंतर त्यांना पूर्णवेळ एसआयआरचे कामकाज करावे लागणार आहे. अनेक ठिकाणी शिक्षक हेच बीएलओ असल्याने ४ जुलै ते १० जुलै या कालावधीत शाळांची वेळ सकाळी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामानये तसेच तासिकांमध्ये सुद्धा काही बदल करु नये, असेही निर्देश आहेत. शनिवारपासून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शाळा सकाळी साडेसात ते दुपारी एक या वेळेत भरणार आहेत. त्यामुळे आता सकाळी शाळेत विद्यादानाचे कार्य करून दुपारच्यावेळी एसआयआरची कामे अशी दुहेरी भुमिका शिक्षकांना वठवावी लागणार आहे.
निवडणुक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत अनेक शिक्षक बीएलओ आहेत. त्यामुळे कुठलेही शैक्षणिक नुकसान होवू न देता शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले आहे. - सतीश मुगल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हापरिषद.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी