
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू केला असून, या मोहिमेत डुप्लिकेट, मयत, स्थलांतरित आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे वगळून नवीन पात्र मतदारांची नोंद करण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती व कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.सोलापूर जिल्ह्यातील ३९ लाख ३८ हजार ६३१ मतदारांसाठी ३ हजार ७२३ बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या मोहिमेदरम्यान बीएलओ प्रत्येक घरी तीन वेळा भेट देणार आहेत. पात्र मतदारांनी या कालावधीत आवश्यक फॉर्म भरून द्यावा. अन्यथा आवश्यक माहिती उपलब्ध न झाल्यास मतदार यादीतील नावाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना केवळ मॅपिंग फॉर्म भरावा लागणार आहे. १ जुलै १९८७ पूर्वी जन्म झाला असूनही मतदार यादीत नाव नसल्यास जन्मतारीख व जन्मस्थळाचा पुरावा सादर करावा लागेल. १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत जन्म झालेल्यांनी स्वतःचा तसेच आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्माचा पुरावा द्यावा लागेल. तर २ डिसेंबर २००४ नंतर जन्म झालेल्या नागरिकांना स्वतःसह आई-वडील दोघांच्याही जन्माचा पुरावा सादर करावा लागणार आहे.मतदारांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड