
पुणे, 04 जुलै (हिं.स.)संतश्रेष्ठ श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. ५ ते ९ जुलैदरम्यान पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख स्थानकांवरून नियमित सेवेसह जादा बसगाड्या धावणार आहेत.आळंदीसाठी स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड येथून दररोज नियमित व विशेष अशा एकूण १७९ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आळंदीसाठी बससेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.माउलींच्या पालखीचे ९ जुलै रोजी आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान होणार असल्याने भाविकांना पहाटेच आळंदीत पोहोचता यावे यासाठी स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक, हडपसर आणि मनपा भवन येथून पहाटे २.३० वाजल्यापासून १८ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ५.३० वाजल्यापासून नियमित मार्गावरील सुमारे १५० बसगाड्या भोसरी आणि विश्रांतवाडीमार्गे आळंदीसाठी धावणार आहेत.देहू येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठीही पुणे रेल्वे स्थानक, मनपा भवन आणि निगडी येथून नियमित तसेच जादा अशा एकूण ३१ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, यासाठी पीएमपीएमएलने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु