
बीड, 04 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील महाराष्ट्र विधानभवनाला भेट देऊन विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहिले. प्रत्यक्ष विधानभवन परिसरात गुरूवारच्या कामकाजानंतर उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांशी आमदार नमिता मुंदडा यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या एकूण कामकाजाबद्दल, लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दल माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आमदार मुंदडा यांनी समर्पक उत्तरे दिली. लोकशाही बळकट करण्यासाठी देशातील युवकांची भूमिका, उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि भविष्यातील समाजकारणातील त्यांची जबाबदारी याची माहिती दिली.
प्रत्यक्ष सभागृहाचे कामकाज पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची ओळख निर्माण होऊन भविष्यातील नेतृत्वाची प्रेरणा मिळेल, असे सांगितले. आमदार नमिता मुंदडा आणि पन्नगेश्वर शुगर मिलचे चेअरमन अक्षय मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नांतून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक वेगळा अनुभव आला असून, विधीमंडळाची सखोल माहिती मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis