
लातूर, 04 जुलै (हिं.स.)।
दि. ०६ जुलै २०२६ रोजी लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होणारा पायी मोर्चा राजर्षी शाहू महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट, अशोक हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे पोहोचणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर गर्दी होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३३ (१)(ब) अन्वये अधिकारांचा वापर करून दि. ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे.
वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग.
- बार्शी रोड : पी.व्ही.आर. चौक ते एक नंबर कॉर्नर, पाण्याची टाकी (संविधान चौक), दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंतचा मार्ग.
- अंबाजोगाई रोड : जुना रेणापूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंतचा मार्ग.
या मार्गांवर मोटारसायकल, तीनचाकी, चारचाकी, एस.टी. बस, ट्रक, टेम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर आदी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी राहील.
पर्यायी वाहतूक व्यवस्था
- बार्शी रोडवरील एस.टी. बसेस पी.व्ही.आर. चौक येथून रिंगरोडमार्गे नवीन व जुना रेणापूर नाका बसस्थानकाचा वापर करतील.
- इतर वाहने रेणापूर नाका, खाडगाव टी-पॉईंट, वाडा हॉटेल, साईधाम, आशियाना बंगला व जुना औसा रोड मार्गाचा वापर करतील.
- औसा रोडवरील एस.टी. बसेस छत्रपती शिवाजी महाराज चौक बस डेपोचा वापर करतील. इतर वाहने जुना औसा रोड, आशियाना बंगला, साईधाम, खाडगाव टी-पॉईंट या पर्यायी मार्गाने जातील.
- अंबाजोगाई रोडवरील एस.टी. बसेस जुना रेणापूर नाका बसस्थानकाचा वापर करतील. इतर वाहने गरुड चौक तसेच बालाजी मंदिर मार्गे पुढील प्रवास करतील.
- शहरातील नागरिकांनी राजस्थान विद्यालय – वेद्रे कॉम्प्लेक्स – औसा रोड – आशियाना बंगला – खाडगाव रोड – रिंगरोड तसेच गांधी चौक – बसवेश्वर महाविद्यालय – रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉज या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
- जुना रेणापूर नाका बसस्थानकावर येणाऱ्या व तेथून सुटणाऱ्या सर्व बसेस रिंगरोडमार्गेच प्रवास करतील.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, दि. ०६ जुलै रोजी सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत वाहतुकीसंदर्भातील निर्बंध व पर्यायी मार्गांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. आवश्यक असल्यास प्रवासाचे नियोजन पर्यायी मार्गांचा विचार करून करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल आणि कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis