
रायगड, 04 जुलै (हिं.स.)। रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातील एचडीपीई पाईपलाईनचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे २ लाख २४ हजार ५४८ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे खारगाव येथील मनोज कुमार शिंदे यांच्या शेतामधील चेनेज क्रमांक ८७०० व ९२०० दरम्यान बसविण्यात आलेल्या ६३० मिमी एचडीपीई पाईपलाईनवरील स्टेनलेस स्टीलचे दोन एअर व्हॉल्व्ह अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत २,२४,५४८ रुपये इतकी आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कैलास बेल्हेकर करीत असून, चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)