लातूर : शेतीतील पाण्याच्या मोटारीतील तांब्याची वायर चोरणारे दोघे जेरबंद
लातूर, 04 जुलै (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतीतील पाण्याच्या मोटारीतील तांब्याची वायर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रेणापूर पोलिसांनी अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली तांब्याची वायर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल
पोलीस कारवाई


लातूर, 04 जुलै (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतीतील पाण्याच्या मोटारीतील तांब्याची वायर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रेणापूर पोलिसांनी अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली तांब्याची वायर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाने उभारलेल्या शेतीतील साहित्याची चोरी ही त्यांच्या उपजीविकेवर थेट आघात करणारी बाब असल्याने अशा गुन्ह्यांची गंभीर दखल घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कृषी अवजारे, पाण्याच्या मोटारी, विद्युत तांब्याच्या वायर तसेच जनावरांच्या चोरीचे गुन्हे प्राधान्याने उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्देशांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रेणापूर येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२१/२०२६ (कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता) च्या तपासादरम्यान पोलिसांनी समीर आजम पठाण (वय २०, रा. अंजली नगर, लातूर) आणि रेहान नौशाद शेख (वय २०, रा. संजय नगर, लातूर) या दोघांना ताब्यात घेतले.

तपासात आरोपींनी रेणापूर येथील रेणा बॅरेज परिसरातील शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीचा तांब्याचा वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ५ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH-24-CC-8045) अंदाजे ३० हजार रुपये किमतीची जप्त केली. अशा प्रकारे एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित शेतकऱ्याला परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande