अमरावती - वरुडच्या दोन युवकांनी सर केले हम्पटा पास
अमरावती, 4 जुलै, (हिं.स.)। वरुड शहरातील साहसी युवा आराध्य कोरडे आणि आर्यन बेलसरे यांनी समुद्रसपाटीपासून १४, १०० फूट उंचीवरील हिमाचलचा प्रसिद्ध हम्पटा पास ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करून वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुल्लू आणि लाहौल खोऱ्या
वरुडच्या दोन युवकांनी सर केले हम्पटा पास


अमरावती, 4 जुलै, (हिं.स.)। वरुड शहरातील साहसी युवा आराध्य कोरडे आणि आर्यन बेलसरे यांनी समुद्रसपाटीपासून १४, १०० फूट उंचीवरील हिमाचलचा प्रसिद्ध हम्पटा पास ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करून वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुल्लू आणि लाहौल खोऱ्यांना जोडणारा सुमारे २८ किलोमीटरचा हा ट्रेक पाच दिवसांत पूर्ण करण्यात आला. मनाली येथून सुरू झालेल्या या साहसी मोहिमेत जॉब्रा, चिका, बलू का घेरा, हम्पटा पास, शिया गोरू आणि छत्रू, असा खडतर प्रवास करीत दोघांनी हिमालयाच्या कुशीत अविस्मरणीय अनुभव घेतला.

ट्रेकदरम्यान कमी ऑक्सिजन, गोठवणारी थंडी, सतत बदलणारे हवामान, बर्फाच्छादित चढाई, हिमनदीवरील प्रवाह आणि कठीण पर्वतीय मार्ग, अशा अनेक आव्हानांचा त्यांनी धैर्याने सामना केला. १४, १०० फूट उंचीवरील हम्पटा पास सर केल्यानंतर कुल्लू खोऱ्यातील हिरवाईतून लाहौलच्या रुक्ष आणि बर्फाच्छादित प्रदेशात होणारा निसर्गाचा अद्भुत बदल अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. या मोहिमेदरम्यान त्यांनी हिमालयातील प्रसिद्ध चंद्रताल सरोवरालाही भेट दिली. निळेशार पाणी, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य यामुळे हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला. आराध्य कोरडे आणि आर्यन बेलसरे यांच्या या यशस्वी साहसी मोहिमेमुळे वरुड शहराच्या नावात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रपरिवार, नागरिक तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच त्यांच्या या यशामुळे इतर युवकांनाही गिर्यारोहण, साहसी पर्यटन आणि निसर्गसंवर्धनाची प्रेरणा मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande