
रायगड, 03 जुलै (हिं.स.)। पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये नियमबाह्य जंगलतोड आणि बेकायदेशीर बांधकामांचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. विशेषतः अलेक्झांडर हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करून वनक्षेत्राचे नुकसान करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माथेरान नगरपरिषदेकडे या प्रकरणाबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) असल्यामुळे येथे कोणतेही बांधकाम किंवा वृक्षतोड करण्यासाठी कठोर नियम लागू आहेत. तरीही संबंधित नियमांना हरताळ फासून बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित हॉटेलच्या मालकांनी सादर केलेल्या बांधकाम परवानग्या आणि मंजुरीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय परवानग्यांची पूर्तता झालेली नसतानाही काम सुरू असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.
दरम्यान, नागरिकांनी नगरपरिषद, वन विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रारी करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करून झालेली वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगर उतारांवरील वृक्षतोड आणि अनियंत्रित बांधकामामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)