
अमरावती, 04 जुलै (हिं.स.)
रिमझिम पाऊस, वातावरणातील गारवा, दऱ्या-खोऱ्यांमध्ये दाटलेले धुके, हिरवाईने पांघरलेले शालू अन् आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी चिखलरा पर्यटनगरी आता सज्ज झाली आहे. शनिवारी तसेच रविवारी या ठिकाणी चांगलीच गर्दी होण्याचे संकेत आहेत. मागील आठवड्यापासून मेळघाटच्या दऱ्या-खोऱ्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील वातावरण अतिशय अल्हाददायक व मनमोहक झाले आहे. सकाळच्या वेळी धुके दाटून येत असून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आहे. त्यामुळे हे वातावरण पर्यटकांना भुरळ घालत आहे. चिखलदऱ्यात प्रमुख्याने आठ ते दहा पॉईंट असून त्यामध्ये प्रामुख्याने भिमकुंड, देवी पॉइंट, ऐतिहासिक गाविलगड किल्ला, मालवीय पॉईंट, शिवसागर पॉइंट, हरिकेन पॉइंट, गोराघाट पॉइंट, पंचबोल पॉइंट यांचा समावेश आहे. प्रत्येक पॉइंटवर पर्यटकांची रेलचेल राहणार आहे. सगळीकडे हिरवळ सध्या चिखलदरात व आजूबाजूच्या मेळघाटचे जंगल हिरवळीने आच्छादले असून नदी नाले सुद्धा वाहू लागल्याने नसर्गाचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. या सोबतच डोंगरावर धुके दाटल्याने पर्यटकांना वेगळीच अनुभूती येत आहे.
अर्थचक्राला येणार वेग
चिखलदरा व आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांचे अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून असून या ठिकाणच्या नागरिकांचे जीवनमान पर्यटनामुळे उंचावले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व्यवसायिकांनी आपली तयारी केली असून पर्यटकांच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झाले आहेत.
बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांसह २०० पोलिस तैनात
तळीरामांवर राहणार विशेष नजर
जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरात पावसाळ्यात पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सुटीच्या दिवसांसह पुढील तीन महिने २०० पोलिस बॉडीवॉर्न कॅमेऱ्यासह तैनात राहणार आहेत. चिखलदरा विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळ असून, पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पर्यटकांचा प्रवास सुरक्षित, आनंददायी व्हावा, वाहतूक विस्कळित होऊ नये, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी ग्रामिण पोलिसांसाठी व्यापक नियोजन करून बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात २०० पोलिस अधिकारी व अंमलदार मदतीला १०० होमगार्ड विविध महत्वाच्या पॉइंटवर तैनात राहणार आहेत. पर्यटनस्थळे, पॉइंट, मुख्य रस्ते, गर्दीच्या ठिकाणावर अशी तैनाती दिसेल. पार्किंग व्यवस्था व वाहतूक नियमावर विशेष लक्ष राहील. पर्यटकांना तत्काळ मदत व्हावी, मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी १४ पोलिस मोटरसायकल रायडर्सना बॉडी वॉर्न कॅमेरा तसेच सार्वजनिक सूचना प्रणाली देण्यात आली आहे. पोलिस रायडर्स सतत गस्त घालून वाहतूक नियंत्रणासह अपघातकालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत. काही उत्साही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून बेधुंद वाहने चालविल्या जातात. त्यांच्यावर कारवाईसाठी तपासणी नाके उभारण्यात आले असून, वाहनचालकांची नियमीत तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाही केल्या जाईल. त्यामुळे वाहनाच्या वेगावर नियंत्रण, हेल्मेट व सिटबेल्टचा वापर, ट्रिपल सीट दुचाकी चालवू नये याकडे लक्ष दिल्या जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरी, पाकीटमारीसह, महिला व युवतीसोबत असभ्य वर्तन केल्या जाते. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथकासह महिलांचे दामिनी पथकही तैनात राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी