एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली परभणीत शिवसेना अधिक मजबूत करणार - खासदार संजय जाधव
परभणी, 04 जुलै (हिं.स.)। शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवून देण्यात परभणी जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली परभणीत शिवसेना अधिक मजबूत करणार - खासदार संजय जाधव


परभणी, 04 जुलै (हिं.स.)।

शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवून देण्यात परभणी जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. शनिवारी (दि. 4) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माणिक पौंढे आणि प्रवीण देशमुख उपस्थित होते. खासदार जाधव म्हणाले की, आपली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कायम बांधिलकी राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊनच मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यांनी सर्व निवडणुका धनुष्यबाण या चिन्हावर लढविल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणतेही प्रस्थापित चिन्ह नसून सर्वच चिन्हे नवीन होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील पाच ते सात वर्षांपासून सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींची गळचेपी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विरोधी पक्षातील जनप्रतिनिधींना विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती मिळेल, कोणत्याही विकासकामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे त्यांनी सांगितले. परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विकासकामांचा मोठा अनुशेष असून तो भरून काढण्यासाठी येत्या काळात प्राधान्याने काम करण्यात येईल, असा विश्वासही खासदार जाधव यांनी व्यक्त केला.7 जुलै रोजी उपमुख्यमंत्री शिंदे परभणी दौर्यावर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (दि. 7) परभणी दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत स्टेडियम मैदानावर भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून ग्रामीण व शहरी भागातील विविध समस्यांची माहिती घेतली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे व्यापारी, वकील, प्राध्यापक आणि विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहितीही खासदार जाधव यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande