
रत्नागिरी, 4 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील गणेश मंदिर परिसरात आज सकाळी अचानक मोठा दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घाटातील तीव्र वळणावर दगड कोसळल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलीस आणि पर्यटकांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अनर्थ टळला.
मुसळधार पावसामुळे घाटात दरड व दगड कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. आज गणेश मंदिर परिसरात मोठा दगड रस्त्याच्या मधोमध येऊन पडला. त्यामुळे काही काळ वाहतूक धोकादायक बनली होती.
यावेळी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सांगलीहून फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनीही मदतीचा हात पुढे केला. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मोठा दगड रस्त्याच्या कडेला ढकलला आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.
वेळीच केलेल्या या प्रयत्नांमुळे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळित झाली. पोलीस आणि पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याने घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी त्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आंबा घाटात दरड व दगड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी खबरदारीने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी