सहकारात उत्तम काम करणाऱ्यांना शासनाचे नेहमीच पाठबळ - देवेंद्र फडणवीस
मुंबई, 4 जुलै (हिं.स.) । सहकारामध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचे नेहमी पाठबळ राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने
दीपक पटवर्धन यांना सहकार गौरव पुरस्कार


मुंबई, 4 जुलै (हिं.स.) । सहकारामध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचे नेहमी पाठबळ राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहकार गौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा समारंभ पार पडला. सहकारात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमात वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रातून चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये सहकार महर्षी विद्याधर अनासकर, सहकाररत्न रेवतीताई पैठणकर, सहकार भूषण आमदार विनयजी कोरे आणि सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.

अॅड. पटवर्धन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. सहकार चळवळीच्या विकासातील मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली होती.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. ॲड. दीपकजी पटवर्धन माझ्या मतदारसंघातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे श्री. सामंत म्हणाले.

या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande