
पुणे, 04 जुलै (हिं.स.)।
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरात जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभर शहराला झोडपून काढले, तर अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम राज्यासह पुणे जिल्ह्यावर होत आहे. त्यामुळे पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून, घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी शहरातील कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळी हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. शिवाजीनगर परिसरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. ताम्हिणी येथे १७० मिलिमीटर, तर लोणावळ्यात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि परिसरात शिवाजीनगर येथे ११, दापोडी ११.५, पाषाण १३.२, एनडीए १३, चिंचवड ८, लवळे ५.५ आणि शिरूर येथे ४.५ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु