
रत्नागिरी, 4 जुलै (हिं.स.) । चिपळूण विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली बैठक आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथील संपर्क कार्यालयात पार पडली. ग्रामीण आरोग्य सेवांवर भर देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरणे, सर्पदंश व श्वानदंशावरील लशींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, देवरूख ग्रामीण रुग्णालय व संगमेश्वर ट्रॉमा केअर सेंटरमधील बंद सेवा तातडीने सुरू करणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.
बैठकीत कामथे उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या ५० खाटांच्या रुग्णालयाबाबत आमदार शेखर निकम यांचे अभिनंदन करणारा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आमदार निकम यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, 'आपला दवाखाना' आणि ग्रामीण रुग्णालयांचे सक्षमीकरण, माता-बाल आरोग्य, लसीकरण, स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती तसेच समितीच्या नियमित त्रैमासिक बैठका घेण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीत देवरूख ट्रॉमा केअर सेंटरच्या सुविधा कार्यान्वित करणे, १०८ रुग्णवाहिका सेवेचा प्रभावी वापर, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टेम कक्ष व वाहनतळ उभारणे, समुदाय आरोग्य अधिकारी पदे भरणे आणि आरोग्य केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे यासंदर्भातील पाच महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
बैठकीस आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी