

रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । ज्येष्ठ नागरिकांकरिता एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने आज आयोजित केलेल्या शिबिरात ११२ जणांची नोंदणी झाली.
एसटी महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यातील सवलत मिळण्यासाठी १९९ रुपये भरून एनसीएमसी कार्ड असणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड्स वितरण करण्यासाठी इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजिस्ट या कंपनीची नेमणूक एसटी महामंडळाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसस्थानकावर न जाता ही कार्डस सुलभरीत्या उपलब्ध व्हावीत, यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने आज संघाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी डी. डी. तराळे उपस्थित होते. दिवसभरात त्यांनी ११२ जणांची नोंदणी करून दिली. आज नोंदणी केलेल्या नागरिकांना सुमारे १५ दिवसांत कार्ड दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आजच्या शिबिराच्या वेळी संघाच्या अध्यक्ष सुभाष थरवळ आणि संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी