
लातूर, 05 जुलै, (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल ३० वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा क्रमांक ३५/१९९५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ४२० व ४०६ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी दत्तू भगवान डावकरे (वय ७०, मूळ रा. मित्रनगर, लातूर, सध्या अंजनपूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हा अनेक वर्षांपासून फरार होता. आरोपीविरुद्धचा खटला न्यायालयात प्रलंबित होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन १९९४ मध्ये फिर्यादीच्या मुलाला पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादीकडून ६,५०० रुपये घेतले होते. भरती न झाल्यानंतर फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर आरोपीने २,५०० रुपये परत केले, तर उर्वरित ४,००० रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तो फरार झाला. न्यायालयाने अटक वॉरंट, नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) तसेच जाहीरनामा जारी करूनही आरोपी वारंवार वास्तव्य बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे आरोपी अटक होईपर्यंत हा खटला निष्क्रिय ठेवण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना आरोपी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत केंद्रे यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अरुण मोरे यांच्या सहकार्याने पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis