रत्नागिरी : पावसाच्या संततधारेमुळे राजापूरमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना पूर
रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । राजापूर तालुक्यात काल दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पुराचे पाणी शहरा
रत्नागिरी : पावसाच्या संततधारेमुळे राजापूरमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना पूर


रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । राजापूर तालुक्यात काल दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकात शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकातील एसटी वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून चौकातील टपऱ्याही पाण्याखाली गेल्या आहेत. राजापूर–शिळ–गोठणे-दोनिवडे मार्गावर अर्जुना नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बंदर धक्का व गणेशघाट परिसरही पुराच्या पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पडझडीच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवर व गोठ्यांवर झाडे कोसळली असून वीजवाहिन्या तुटल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. नाटे-बाणेवाडी येथे भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने नुकसान झाले असून पोकळेवाडीपर्यंत जाणारा रस्ता बंद झाला आहे. कातळी गावात अ रहीम अ. लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पन्हाळे तर्फे राजापूर येथील बौद्धवाडी परिसरात वीजवाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कशेळी येथील देवघळी बीच सनसेट पॉइंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन शहरातील नदीकाठावरील व्यापारी आणि नागरिकांनी शनिवारीच आपापल्या मालाची सुरक्षित ठिकाणी हलवणूक केल्याने मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राजापूर तहसील कार्यालयाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे तसेच धरण परिसरातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदार कार्यालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी नदी, नाले, पूल, धबधबे तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. पाण्याचा वेग अधिक असलेल्या ठिकाणी रस्ता किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच विजेच्या तारा, विद्युत उपकरणे आणि पाण्यातील विद्युत धोक्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. केवळ प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक ग्राम प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करत आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहावे, असे राजापूर तहसील कार्यालयाने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande