
लातूर, 05 जुलै (हिं.स.)।
पाठलाग करून मारहाण करणे आणि रोख रक्कम लुटल्याच्या प्रकरणातील आरोपींवर गांधी चौक पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांची गंजगोलाई मार्केट परिसरातून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये या घटनेची चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गांधी चौक पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यानंतर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिसांनी आरोपींची गंजगोलाई मार्केट परिसरातून कडेकोट बंदोबस्तात धिंड काढली. या कारवाईदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे गांधी चौक पोलिसांनी सांगितले.
--
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis