नाशिक : भोसला मिलिटरी कॉलेजचा ज्येष्ठांसाठी सोमवारी भव्य वॉकथॉन'
नाशिक, 05 जुलै (हिं.स.)।सुदृढ आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजतर्फे ७ जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य ''वॉकथॉन''चे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्
नाशिक : भोसला मिलिटरी कॉलेजचा ज्येष्ठांसाठी सोमवारी भव्य वॉकथॉन'


नाशिक, 05 जुलै (हिं.स.)।सुदृढ आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजतर्फे ७ जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य 'वॉकथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून नाशिककर ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्पर्धा तीन वयोगटांत होणार आहे. ६० ते ७० वर्षे वयोगटासाठी ७ किलोमीटर, ७० ते ८० वर्षांसाठी ५ किलोमीटर, तर ८० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ३ किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले आहे. नाशिकसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, हौशी खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचाही पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भोसला मिलिटरी स्कूल परिसरातील हुतात्मा स्मारक येथून प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकथॉनला प्रारंभ होईल. भोसला सावरकर प्रवेशद्वार, बापू पूल, गोदापार्क, दत्तमंदिर चौक, निर्मला स्कूल, सोनवणे चौक असा मार्ग पार करत स्पर्धेचा समारोप पुन्हा भोसला महाविद्यालयात होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश केवळ चालण्याची स्पर्धा आयोजित करणे नसून, वाढत्या वयातही आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि नियमित व्यायामाची सवय लावणे हा आहे. तसेच भोसला कॅम्पसमधील विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेला संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि. संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य, कार्यकारिणी सदस्य अॅड. सुयोग शहा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आयोजकांनी नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांनी या वॉकथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निरोगी जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande