
लातूर, 05 जुलै (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी कामकाजाला वेग देत वरवंटी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळा क्र. ९ लाही भेट दिली.
आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार होणारे कंपोस्ट खत, सुका कचरा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प तसेच जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पूर्णपणे विलगीकृत कचरा येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रक्रियेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी सुरक्षा किटचा नियमित वापर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणीदरम्यान मनपा उपायुक्त वसुधा फड, कनिष्ठ अभियंता गणेश देवणीकर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रमुख धोंडीबा सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यानंतर आयुक्तांनी सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्र. ९ ला भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनपा शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली.
पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ विविध विभागांना भेटी देत आयुक्त राहुल कुलकर्णी शहराच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेत असल्याने प्रशासनात चैतन्य निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis