
परभणी, 05 जुलै (हिं.स.)।
मानवत रोड रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर करावा तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मानवत तालुका रेल्वे व विकास संघर्ष समितीच्या वतीने खा. संजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, मानवत रोड रेल्वे स्थानक हे मानवत, पाथरी, सोनपेठ, माजलगाव व परिसरातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचे स्थानक आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. तसेच साईबाबा जन्मस्थान असलेल्या पाथरी येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी मानवत रोड हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असल्याने धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानकाचे महत्त्व वाढत आहे.मात्र, अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, मानवत रोड रेल्वे स्थानक परिसरात विशेषतः रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमित पोलिस गस्त, कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, पुरेशी प्रकाशव्यवस्था व इतर सुरक्षा सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.या गाड्यांना थांबा देण्यात यावा नांदेड–पुणे एक्स्प्रेस (१७६२९/१७६३०), मुंबई–आदिलाबाद एक्स्प्रेस (११००१), हिंगोली–मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस (१७०७२/१७०७३) तसेच नांदेड–अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (१२७१५/१२७१६)रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर खा. जाधव यावेळी खा. जाधव यांनी सांगितले की, नांदेड येथे होणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीसाठी या सर्व मागण्या अगोदरच मांडलेल्या आहेत. बैठकीत मानवत रोड रेल्वे स्टेशन संदर्भातील मागण्यासाठी जोरदार पाठपुरावा करणार. निवेदनावर अध्यक्ष डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, शामभाऊ झाडगावकर, गोपाळ लाड, प्रसाद जोशी, विलास बारहाते, मयूर मिस्त्री, प्रकाश करपे, बालाजी पोकळे,प्रा. पवन बारहाते, प्रफुल्ल जैन, रवि कत्रुवार, कपिल उदावंत, आनंद गोजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis