
अमरावती, 05 जुलै (हिं.स.)मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसाने सध्या दमदार हजेरी लावल्यामुळे अमरावती जिल्ह्यात रखडलेल्या खरीप पेरण्यांना मोठी गती आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ५० टक्के म्हणजेच ३ लाख ४३ हजार ५०० हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या आहेत.
विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या तुलनेत कापूस लागवडीला पहिली पसंती दिली असल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेला पाऊस पेरणीसाठी अत्यंत पोषक ठरल्याने खोळंबलेले शेतकरी कामाला लागले आहेत. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर ही मुख्य पिके घेतली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत मक्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून, मूग व उडदाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. तुरीची पेरणी अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. गत हंगामात कापसाला मिळालेला चांगला दर आणि शासकीय खरेदीचा मिळालेला पाठिंबा यामुळे शेतकऱ्यांचा ओढा कापूस पिकाकडे वाढला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी २१ टक्के क्षेत्रावर कापसाची, तर १९ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. १ लाख ४९ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची, तर १ लाख ३० हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तालुकानिहाय पेरणीचा विचार केल्यास धामणगाव रेल्वे तालुक्यात सर्वाधिक ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी