नाशिक : विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ मृत्यू प्रकरणी सहकारी तंत्रज्ञ निलंबित; कार्यकारी अभियंत्याची चौकशी सुरू
नाशिक, 05 जुलै (हिं.स.)। जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रावर काम करताना विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ जय सकट यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर महावितरणने प्रशासकीय कारवाई करत त्यांचा सहकारी तंत्रज्ञ राजेश चौरे यांन
नाशिक : विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ मृत्यू प्रकरणी सहकारी तंत्रज्ञ निलंबित; कार्यकारी अभियंत्याची चौकशी सुरू


नाशिक, 05 जुलै (हिं.स.)। जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रावर काम करताना विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ जय सकट यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर महावितरणने प्रशासकीय कारवाई करत त्यांचा सहकारी तंत्रज्ञ राजेश चौरे यांना निलंबित केले आहे तर दोन कार्यकर्त्याबीयंतांची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांना तशी नोटीसही बजविण्यात आली आहे.

१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास नारायण बापूनगर (आढाव मळा) परिसरातील विद्युत रोहित्रावर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना जय सकट यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत काम करणारे तंत्रज्ञ राजेश चौरे यांनाही या घटनेचा मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक चौकशीत दोन्ही तंत्रज्ञांनी कामादरम्यान आवश्यक विद्युत सुरक्षा साधनांचा वापर न केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. विशेषतः इन्सुलेटेड हातमोजे, डिस्चार्ज रॉड व डीओ रॉड यांसारखी सुरक्षा उपकरणे वापरण्यात आली नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, सहकारी तंत्रज्ञ म्हणून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत महावितरणचे शहर - २ विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश जाधव यांनी राजेश चौरे यांना निलंबित केले आहे . काम सुरू करण्यापूर्वी आणि कामादरम्यान निर्धारित सुरक्षा उपकरणांचा वापर झाला असता, तर ही दुर्दैवी दुर्घटना टाळणे शक्य झाले असल्याचे बोलले जात आहे.

तर नाशिक परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर नोटीस कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून बजावली आहे. या दुर्दैवी अपघातात तसेच विद्यूत सुरक्षेची जबाबदारी असणारे सदर दोन्ही कार्यकारी अभियंता यांनी जनमित्रांचे सुरक्षा साधनांचा वापर करण्या संदर्भात योग्य प्रकारे प्रबोधन केले नाही, अशी विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रक्रियेचे अधिक काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande