
लातूर, 05 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) लातूर विभागाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि बसस्थानक परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जून २०२६ या मार्ग तपासणी पथकाद्वारे करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत ४७ प्रवासी विनातिकिट प्रवास करताना आढळून आले. एसटी प्रशासनाने या दोषी प्रवाशांकडून दंडापोटी २६ हजार २४० रुपयांचा दंड वसुल केला आहे.
केवळ विनातिकिट प्रवासच नव्हे, तर बसस्थानक परिसरातील बेशिस्त वाहतुकीवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नियमानुसार, बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश करणे किंवा प्रवासी घेणे पूर्णतः निषिद्ध आहे. मात्र, अनेक खासगी वाहनधारक सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करून बसस्थानकातील प्रवाशांना आपल्या वाहनात ओढतात. अशा बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध रा.प. महामंडळाची सुरक्षा शाखा, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या संयुक्त कारवाईत जून महिन्यात बसस्थानक परिसरातील २०० मीटरच्या आत प्रवासी वाहतूक करणाऱ्या १ हजार २० खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर एसटी विभागाने विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विभागात ६ विशेष मार्ग तपासणी पथके तैनात केली होती. या पथकांनी जून महिन्यात ८३९ मार्गांवर बसस्थानके आणि बसथांब्यांवर धडक मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ३ हजार ५१२ एसटी बसेसची तपासणी करण्यात आली, तर १ हजार ९९८ वाहकांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी ४७ प्रवासी विनातिकिट प्रवास करताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एसटीच्या या धडक मोहिमेमुळे आता विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे आणि अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे प्रवाशांमधून स्वागत होत असून, यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis