रायगड : दिघी खाडीत मच्छीमारांच्या बोटीला अपघात; फेरीबोटीने वाचवले तीन जीव
रायगड, 05 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील दिघी खाडीत शनिवारी मासेमारीसाठी गेलेली एक छोटी बोट अचानक पाण्यात बुडाल्याने मोठी दुर्घटना टळली. बोटीत असलेले तीन मच्छीमार जीव वाचवण्यासाठी पाण्यात झुंज देत असताना जवळून जाणाऱ्या फेरीबोटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंग
Fishermen's boat meets with accident in Dighi Creek; ferry saves three lives.


boat


रायगड, 05 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील दिघी खाडीत शनिवारी मासेमारीसाठी गेलेली एक छोटी बोट अचानक पाण्यात बुडाल्याने मोठी दुर्घटना टळली. बोटीत असलेले तीन मच्छीमार जीव वाचवण्यासाठी पाण्यात झुंज देत असताना जवळून जाणाऱ्या फेरीबोटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य केले. त्यामुळे तिन्ही मच्छीमारांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, भरती, पावसामुळे निर्माण झालेला जोरदार वारा आणि खाडीतील अस्थिर पाण्यामुळे बोटीचा तोल गेला. काही क्षणांतच बोट पाण्यात बुडू लागली. बोटीत असलेल्या तिन्ही मच्छीमारांनी पाण्यात उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्या मार्गावरून प्रवाशांना घेऊन जाणारी फेरीबोट घटनास्थळाजवळ पोहोचली.

फेरीबोटीच्या चालक व कर्मचाऱ्यांनी तातडीने बोट थांबवून दोर आणि जीवनरक्षक साधनांच्या मदतीने तिघा मच्छीमारांना सुरक्षित बाहेर काढले. या तत्पर बचावकार्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. घटनेनंतर मच्छीमारांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले असून ते सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे पावसाळ्यात समुद्र आणि खाड्यांमध्ये मासेमारी करताना अधिक दक्षता बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. हवामान खराब असताना अथवा भरतीच्या वेळी लहान बोटी समुद्रात किंवा खाडीत न उतरविण्याचे आवाहन प्रशासन आणि मत्स्य विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे.

दिघी खाडीतील या घटनेत फेरीबोटीच्या चालक आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे तीन कुटुंबांवर ओढवू शकणारे मोठे संकट टळले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande