नौदलातील सुवर्णसंधींचा उलगडा; ८७५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रायगड, 05 जुलै (हिं.स.)। सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९७व्या पुण्यतिथी अभिवादन दिनानिमित्त गाज फाउंडेशन आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने कुरूळ कॉलनी सभागृहात ''पाथवे टू सर्विसेस'' या विशेष म
Golden opportunities in the Navy unveiled; enthusiastic participation by 875 students.


Golden opportunities in the Navy unveiled; enthusiastic participation by 875 students.


रायगड, 05 जुलै (हिं.स.)। सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९७व्या पुण्यतिथी अभिवादन दिनानिमित्त गाज फाउंडेशन आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने कुरूळ कॉलनी सभागृहात 'पाथवे टू सर्विसेस' या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रेचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर प्रशांत चंद्रशेखरन यांनी विद्यार्थ्यांना भारतीय नौदलातील विविध सेवांच्या संधी, भरती प्रक्रिया, आवश्यक पात्रता आणि करिअरच्या विविध पर्यायांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. देशसेवा करताना नौदलात उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयएनएस अभिमन्यूचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन विकास दहिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नौदलातील प्रत्यक्ष अनुभव, प्रशिक्षण, शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

यानंतर भारतीय नौदलाच्या विशेष कमांडो दल मार्कोस (MARCOS) यांच्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात युद्ध तसेच दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये वापरली जाणारी आधुनिक शस्त्रे, अत्याधुनिक संसाधने आणि उपकरणे विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी मिळाली. तसेच मार्कोस कमांडोंशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्याची दुर्मीळ संधीही विद्यार्थ्यांना लाभली.

तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील तब्बल ८७५ विद्यार्थ्यांनी या परिसंवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नौदलातील करिअरविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि देशसेवेची प्रेरणा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande