ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे, बृहन्मुंबईत झाडे/ फांद्या पडण्याच्या १४२ घटनांची नोंद
* मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीही यंत्रणांनी सतर्क राहावे - मनपा आयुक्त मुंबई, 05 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्ये मागील २४ तासांत सुमारे १५० ते १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत संततधार पाऊस व समुद्राला
ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे, बृहन्मुंबईत झाडे/ फांद्या पडण्याच्या १४२ घटनांची नोंद


* मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीही यंत्रणांनी सतर्क राहावे - मनपा आयुक्त

मुंबई, 05 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्ये मागील २४ तासांत सुमारे १५० ते १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत संततधार पाऊस व समुद्राला मोठी भरती असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. विशेष म्हणजे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कोठेही पाणी साचल्याची घटना घडली नाही. ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या एकूण १४२ घटनांची नोंद झाली. या संपूर्ण परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अविरतपणे कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.

भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती होती. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका मुख्‍यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्‍यक ते निर्देश दिले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्‍य) श्री. शरद उघडे यांच्‍यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सर्व परिमंडळ उपायुक्‍त आणि सर्व सहायक आयुक्त (प्रभाग अधिकारी) तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे. उप आयुक्तांनी याबाबत स्वतः खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सतर्कतेवर असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सर्व विभागप्रमुख, अभियंते, पंपचालक, आरोग्य कर्मचारी तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सध्या तब्बल १० हजार कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करत आहेत.

दिनांक ४ जुलै सांयकाळी ५ ते दिनांक ५ जुलै २०२६ रोजी ५ वाजेपर्यंत या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे १५० ते १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहर विभागात १५३ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १२१ मिलीमीटर आणि पश्‍चिम उपनगरांमध्‍ये सरासरी ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिनांक ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती होती. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि समुद्राला भरती असूनदेखील बृहन्मुंबई क्षेत्रातील जनजीवन दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सुरळीत होते. शहर आणि उपनगरांतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी असलेले अधिकारी - कर्मचारी वेळीच उपाययोजना करत असल्‍याने सखल भागात पाणी साचल्याची तक्रार आज प्राप्त झाली नाही.

पावसाळा पूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने १ लाख ६२ हजार ६७६ झाडांचे सर्वेक्षण केले. तसेच १ लाख ३ हजार झाडांची छाटणी करण्यात आली. तर ६४८ धोकादायक झाडे काढून टाकण्यात आली. दरम्यान, आज मुसळधार पावसासह ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहिले. त्‍यामुळे बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे २७६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी प्रत्‍यक्षात १४२ तक्रारी या झाडे / फांद्या पडल्याच्या होत्या. महानगरपालिका कर्मचा-यांनी तत्‍परतेने या समस्‍यांचे निराकरण केले. रस्‍त्‍यांवर पडलेल्‍या फांद्या / झाडे उचलून वाहतूक सुरळीत करण्‍यास प्राधान्‍य दिले. कुर्ला कमानी येथे गोम्‍स टाऊन इमारतीजवळील दुकानावर झाडाची फांदी तुटून युनुस कुंडावाला, वय ६३ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुस-या एका दुर्घटनेत आरे कॉलनीत युनीट १३ हद्दीत झाड कोसळून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

वरळी डेअरीजवळ खान अब्‍दुल गफार खान मार्गावर तीन मजली रिकामे असणारे बांधकाम पडल्याची देखील नोंद झाली. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande