हुंदाई क्रेटा इलेक्ट्रिकचे BaaS मॉडेल लॉन्च
मुंबई, 05 जुलै (हिं.स.)। हुंदाई मोटर इंडियाने आपल्या क्रेटा इलेक्ट्रिकसाठी नवीन ''बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस'' (BaaS) मालकी मॉडेल सादर केले आहे. या नव्या पर्यायामुळे इलेक्ट्रिक एसयूव्हीची सुरुवातीची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली असून आता ही कार 10.99 ल
Hyundai Creta Electric BaaS Model Launched


मुंबई, 05 जुलै (हिं.स.)। हुंदाई मोटर इंडियाने आपल्या क्रेटा इलेक्ट्रिकसाठी नवीन 'बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस' (BaaS) मालकी मॉडेल सादर केले आहे. या नव्या पर्यायामुळे इलेक्ट्रिक एसयूव्हीची सुरुवातीची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली असून आता ही कार 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये वाहन आणि बॅटरीची खरेदी स्वतंत्र ठेवण्यात आली असून ग्राहकांना बॅटरी सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून वापरता येणार आहे. त्यामुळे एकरकमी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज कमी होणार असून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे अधिक सोपे होईल, असा कंपनीचा दावा आहे.

या योजनेअंतर्गत ग्राहकांना बॅटरीसाठी स्वतंत्र फायनान्सिंगची सुविधा मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, बॅटरीसाठी ईएमआयचा खर्च प्रति किलोमीटर 3.9 रुपयांपासून सुरू होतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीचा जास्त खर्च हा अनेक ग्राहकांसाठी अडथळा ठरत होता. हा अडथळा कमी करून अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

BaaS मॉडेलसोबतच हुंदाईने क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये काही नवीन सुविधांचाही समावेश केला आहे. आता या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये इंटिग्रेटेड साइड फूट-स्टेप्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनात चढणे आणि उतरणे अधिक सोयीचे होणार असून एसयूव्हीचा लूकही अधिक आकर्षक दिसेल. ग्राहकांच्या अभिप्रायाचा विचार करून कंपनीने होम चार्जिंग सुविधेतही बदल केले आहेत. पूर्वीच्या सेटअपऐवजी आता सर्व संबंधित व्हेरिएंट्समध्ये 7.4 किलोवॅट क्षमतेचा वॉल बॉक्स चार्जर स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आला आहे.

क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना 42 kWh आणि 51.4 kWh क्षमतेच्या बॅटरींपैकी निवड करता येईल. मोठ्या 51.4 kWh बॅटरीसह ही एसयूव्ही एका चार्जमध्ये ARAI प्रमाणित 510 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच डीसी फास्ट चार्जिंगच्या मदतीने योग्य परिस्थितीत बॅटरी केवळ 39 मिनिटांत 10 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. लाँग-रेंज व्हेरिएंट अवघ्या 7.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहे.

वैशिष्ट्यांच्या बाबतीतही क्रेटा इलेक्ट्रिक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात व्हेईकल-टू-लोड (V2L) सुविधा, ह्युंदाई स्मार्टसेन्स लेव्हल-2 ADAS, सिंगल पेडल ड्राइव्ह (आय-पेडल), डिजिटल की सपोर्ट, ॲक्टिव्ह एअर फ्लॅप्स यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय कंपनीकडून बॅटरीवर आठ वर्षे किंवा 1.6 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी दिली जात असल्याने ग्राहकांना दीर्घकालीन विश्वास आणि सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. नवीन BaaS मॉडेलमुळे क्रेटा इलेक्ट्रिक अधिक परवडणारी ठरत असून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान BaaS शिवाय, क्रेटा श्रेणीची किंमत १८.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन २४.७० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande