
परभणी, 05 जुलै (हिं.स.)। श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परभणी महानगरपालिकेने उभारलेल्या आरोग्य पथकाची कडूबाईच्या मळा येथे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वारकऱ्यांना तत्पर व प्रभावी वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी डॉ. समप्रिया राहुल पाटील यांनीही कडूबाईच्या मळा येथील आरोग्य पथकाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवांची माहिती घेतली. पथकाकडून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या औषधोपचार, प्राथमिक उपचार व अन्य आरोग्य सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणताही आरोग्यविषयक त्रास होऊ नये, यासाठी परभणी महानगरपालिकेने विविध ठिकाणी आरोग्य पथके, आवश्यक औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवली असून संपूर्ण यंत्रणा दक्षतेने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis