मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत घोळ?; संचमान्यता व आरटीई कायद्याला हरताळ फासल्याचा आरोप
अमरावती, 05 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि धारणी व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत ३ जुलै रोजी राबविण्यात आलेली कंत्राटी शिक्षक भरती समूपदेशन प्रक्रिया म्हणजे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांची उघड गळचेपी
मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत घोळ?; संचमान्यता व आरटीई कायद्याला हरताळ फासल्याचा आरोप


अमरावती, 05 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि धारणी व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत ३ जुलै रोजी राबविण्यात आलेली कंत्राटी शिक्षक भरती समूपदेशन प्रक्रिया म्हणजे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांची उघड गळचेपी करणारा प्रकार असल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला आहे. या संपूर्ण घोळाप्रकरणी संघटनेने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यांसह सविस्तर लेखी निवेदन सादर केले. तसेच ही संपूर्ण दोषपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया न राबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. ३ जुलै रोजी पार पडलेल्या समूपदेशनात शिक्षण विभागाने उपलब्ध जागांचा वास्तविक डेटा जाणीवपूर्वक लपवून ठेवला. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त असताना, ही पदे समूपदेशन प्रक्रियेत उमेदवारांना दाखविण्यातच आली नाहीत. मोजक्याच शाळांची यादी समोर ठेवून प्रशासनाने स्वतःचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्या सखोल चौकशीची मागणी संघटनेने लावून धरली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार नेहमीच शोषितांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत आला आहे. मेळघाटातील गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळणारा हा भ्रष्ट कारभार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. प्रशासनाने पुढील ७ दिवसांत यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास, प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर व शिक्षण विभागावर तीव्र स्वरूपाचे एल्गार आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा महेश ठाकरे यांनी दिला आहे.

--------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande