
रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । अतिपावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचे पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
नदीची धोकापातळी सात मीटर असून, आज सकाळी ११ वाजता भरणे पूल येथे पाण्याची पातळी ७.३० मीटर होती. संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत ती ९.८० मीटरवर गेली आहे. त्यामुळे शहराच्या आणखी काही सखल भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. खेड तालुक्यातील नारिंगी नदीचे पाणीही पात्राबाहेर आले आहे.
अतिपावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी दरडी आणि झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंडणगड तालुक्यात तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पावसामुळे दापोलीतही काही ठिकाणी पाणी साचले आहे.
दरम्यान, लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वाकेडमध्ये पेट्रोल पंपाजवळ काल रात्री कोसळलेली दरड दूर करण्यात आली असून तेथे गाडल्या गेलेल्या मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी