
मुंबई, 05 जुलै (हिं.स.)। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कुर्ला पश्चिम परिसरात रविवारी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. कमानी येथील बीएमसी शाळेजवळील गोम्स गाऊन बिल्डिंग परिसरात मोठे झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या परिसरातील झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कुर्ल्यातही झाड पडून नागरिकाचा जीव गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास परिसरात अचानक वेगवान वारे सुरू झाले. त्यावेळी एक मोठे झाड उन्मळून शेजारील दुकानावर कोसळले. याच दुकानात युनूस कुंडावाला उपस्थित होते. झाडाचा मोठा भाग दुकानावर कोसळल्याने ते गंभीररीत्या अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून त्यांना बाहेर काढले आणि जवळील फौझिया रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि पालिकेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्याने झाडाचे अवशेष हटवून परिसर सुरक्षित केला. झाड कोसळल्यामुळे वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले असून काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले. मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून मुंबई महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुर्घटनेनंतर चार ते पाच तास उलटूनही पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्याचा आरोप मनसेने केला. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला.
गेल्या काही दिवसांतील झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये मुंबईतील हा तिसरा बळी ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मान्सूनपूर्व झाडछाटणीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना अशा दुर्घटना का घडत आहेत, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृताच्या कुटुंबाला न्याय आणि योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांसह मनसेकडून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule